औरंगाबाद : मराठवाड्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना २ कोटी रुपये आणीबाणी म्हणून आरक्षित ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी दिले. विभागातील सिव्हिल सर्जन, एनआरएचएमअंतर्गतही रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. प्राधान्याने कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निधी ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्तालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी, घाटी अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक, पोलीस, मनपाचे अधिकारी होते. याबाबत ठाकूर म्हणाल्या, कोरोना व्हायरस काय आहे, सामान्यांपर्यंत माहिती देणे, जनजागृती करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे, तेथे माहिती देऊन आवाहन करण्यात येणार आहे. जेथे यात्रा, उरूस आहेत. त्यासाठी काय उपाययोजना असाव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. नाथषष्ठी रद्द करण्याबाबत विचार असला तरी भावनिक मुद्यांवर थेट निर्णय होत नाही. पैठणचे विश्वस्त आजच्या बैठकीला उपस्थितीत राहू शकले नाहीत. राज्यभरात निर्णय होत आहेत, त्यानुसार जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. नाथषष्टी म्हणूनच नाही, तर पूर्ण प्रशासन म्हणून बैठक घेतली. मांगीरबाबाची यात्रा आहे, सर्व विश्वस्तांना विश्वासात घेऊन पुढे जावे लागणार आहे. राज्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले असताना प्रशासनाने गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्याचे ठरविले आहे काय? या प्रश्नावर ठाकूर म्हणाल्या, अजून तसे केले नाही. रेल्वे, बसस्थानक, विमानतळ येथे दक्षता घेतली जात आहे.
धार्मिक, सामाजिक कार्यक्रम टाळाप्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे म्हणाले, पैठण येथील यात्रेच्या निर्णयअनुषंगाने सीईओ, एसडीएम, तहसीलदार, बीडीओ व घाटी रुग्णालय पथकाला बोलावले होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रोहयोमंत्री संदीपान भुमरे हे आहेत. विश्वस्तांच्या कानावर सर्व बाबी टाकल्या आहेत. जिह्यातील सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम टाळावेत, असे नागरिकांना आवाहन केले आहे.