औरंगाबाद : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर आज काही टवाळखोरांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात घडली. या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला करून पसार झालेल्या पाच हल्लेखोरांचा शोध सिटीचौक पोलीस घेत आहेत.
सध्या औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संकटात होरपळत आहे. दिवसेंदिवस औरंगाबादेतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पोलीस रात्रंदिवस ड्यूटी बजावत आहेत.
या परिस्थितीत आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे चौकात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना पाच टवाळखोरांनी पोलिसांच्याच हातातील काठी हिसकावून पोलिसांवरच हल्ला केला. गाडी का थांबवली अशी हुज्जत घालत त्या गुंड तरूणांनी आपल्या ईतर सहकाऱ्यांना बोलवून पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन वाहतूक पोलिस जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर हे गुंड दुचाकीवरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली असून सिटीचौक पोलिस या टवाळखोरांचा शोध घेत आहेत.