- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटीत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) मंजूर करण्यात आली आहे. मात्र, ही प्रयोगशाळा कागदावरच असून, महिनोन्महिने तिची प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, स्वाईन फ्लू आणि सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’वरच भिस्त आहे. त्यामुळे मराठवाड्याला विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी वाट पाहण्याची वेळ ओढवत आहे.
विषाणूजन्य आजारांच्या निदानसासाठी आॅक्टोबर २०१९ मध्ये घाटीत अतिशय अद्ययावत अशी ‘व्हीआरडीएल लॅब’ मंजूर करण्यात आली. या प्रयोगशाळेचे लवकरच काम सुरू होईल आणि आगामी काही कालावधीत रुग्णसेवेत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; परंतु अद्यापही ही प्रयोगशाळा पूर्णत्वास गेलेली नाही. स्वाईन फ्लूसह अन्य गंभीर विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी मराठवाड्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांचे नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात येतात. नमुने पाठविण्यासह प्रत्यक्ष अहवाल मिळण्यात किमान ३ ते ४ दिवस जातात. कोरोना संशयित रुग्णांचे अहवालही याच ठिकाणी पाठविण्यात येत आहेत. राज्यभरातून नमुने येतात. त्यामुळे अहवालासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ ओढवत आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेने गती येण्याची अपेक्षाकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादसह अन्य काही शहरांतील वैद्यकीय महाविद्यालयांत महिनाभरात प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न असल्याचे दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे औरंगाबादेतील प्रयोगशाळा मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बांधकाम, यंत्रसामग्रीत जाईल वेळप्रयोगशाळेचे बांधकाम, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी केली जाईल. येथील उपकरणे अत्याधुनिक असतील; परंतु बांधकाम आणि यंत्रसामग्री प्राप्त करण्यात वेळ जाण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया अधिक गतीने करणे गरजेचे आहे.