औरंगाबाद : मिनी घाटीतील डॉक्टरांची नजर चुकवून पळून गेलेल्या रुग्ण माय-लेकीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने सिपेटमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. चिकलठाणा येथील मिनी घाटीतील डॉक्टरांची नजर चुकवून आणि सुरक्षारक्षकांना रुग्णाचे नातेवाईक असल्याची थाप मारून पलायन केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह मायलेकीविरुद्ध २१ जुलै रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आपणास कोरोनाचा संसर्ग झाला, यावर त्यांचा विश्वासच नव्हता. मिनी घाटीतील डॉक्टरला त्यांनी त्यांची पुन्हा तपासणी करा, असे सांगितले होते. मात्र, त्याची आवश्यकता नाही तुम्ही दहा दिवस येथील विलगीकरण वॉर्डात उपचार घ्या, असे त्यांना सांगण्यात आले होते. रात्री त्यांनी मग रुग्णालयातून पलायन केले आणि त्या घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या दोघींनी एमजीएम येथील कोविड सेंटर येथे जाऊन कोरोना तपासणी केली. तेव्हा तेथे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांना विभागीय क्रीडा संकुल येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तेथे गेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. कराड यांच्याकडे त्यांनी मिनी घाटीत पाठवा, असा आग्रह धरला. डॉक्टरांनी अधिक चौकशी केल्यानंतर पलायन केलेल्या माय-लेकी असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना देण्यात आली. आता त्यांना सिपेट येथील कोविड विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.