औरंगाबाद : घाटी रुग्णालयात एका कंपनीने सॅम्पल म्हणून दिलेले 'पीपीई' किट अखेर गुरुवारी कर्मचाऱयांकडून परत घेण्यात आले. यापुढे घाटीला प्राप्त होणाऱ्या 'पीपीई'ची पडताळणी करण्यासाठी समितीही नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका कंपनीने सॅम्पल म्हणून दिलेले 'पीपीई' किट कर्मचाऱयांना वापरण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने ९ एप्रिल रोजी ' सॅम्पल पीपीईचा प्रयोग,कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळ' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आला. वृत्त प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या घाटी प्रशासनाने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना वितरित केलेली सॅम्पल पीपीई परत घेण्याची सूचना केली. त्यानुसार कर्मचार्यांपर्यत गेलेली पीपीई तातडीने परत मागविण्यात आली. त्याऐवजी शासनाकडून प्राप्त 'पीपीई' वितरित करण्यात आली.
घाटी रुग्णालयात कोरोना संशयित आणि बाधितांवर उपचार करणाऱ्या कर्मचार्यांना निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट दिले जात असून, ते फाटत आहेत. एन-९५ मास्कही चांगल्या दर्जाचे नसल्याने जिवाशी खेळ सुरु असल्याची ओरड कर्मचार्यांतून होत होती. हे पीपीई आधी शासनकडून आणि नंतर डोनेट केल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे पीपीई एका कंपनीने सॅम्पल म्हणून दिल्याचे 'लोकमत'ने समोर आणले.
पीपीई' समितीसमोर ठेवली जातील
ज्या दिवशी सॅम्पल पीपीई देण्यात आले, तेव्हा घाटीत पीपीईचा उपलब्ध नव्हते. केवळ लहान साईजचे पीपीई देण्यात आले. त्यामुळे ते फाटत होते. हे सर्व सॅम्पल कर्मचाऱ्यांकडून परत घेण्यात आले आहे. तसेच यापुढे देण्यात येणारे 'पीपीई' समितीसमोर ठेवली जातील. शासनाकडून एन-९५ मास्क देण्यात आल्याचे सांगितले होते. -डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
वरिष्ठ पातळीवरून चौकशी
सॅम्पल पीपीई वापरण्यासाठी देण्यात आलेल्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी केली जाणार आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात असे सॅम्पल पीपीई वापरण्यासंदर्भात प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.