- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आता एसटी महामंडळानेही कंबर कसली आहे. चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सॅनिटायझर बसची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांत ही बस तयार होणार आहे. प्रवाशांना सुरक्षित सेवा देणारे महामंडळ म्हणून एसटी महामंडळाची ओळख आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. या कोरोनाच्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी एसटी महामंडळाने सॅनिटायझर बसची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस फक्त महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी नसून, प्रत्येक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सोमवारपासून दोन बस निर्मितीचे काम सुरू झाले आहे. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझरचे फवारे उडतील, अशी रचना केली जात आहे. यापूर्वी अनेक प्रसंगात एसटीने आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या काळात एसटीने पुढाकार घेतला आहे. दोन दिवसात होणार तयार सॅनिटायझरची बस तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आगामी दोन दिवसांत बस तयार होईल, असे कार्यशाळा व्यवस्थापक संजय सांगलीकर यांनी सांगितले.
पोलिसांनी तयार केले आगळेवेगळे सॅनिटायझर यंत्र घाटी रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलीस नाईक मनोहर सोनवणे, आर. डी. देशमुख, मिल्खा तडवी यांनी अगळेवेगळे सॅनिटायझर यंत्र केले आहे. यासाठी ड्रम, पाण्याची मोटार, शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारे पंप यांचा वापर केला. हे यंत्र चौकीच्या प्रवेशद्वारवर बसविण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळील बटन दाबताच अंगावर सॅनिटायझर पडते. त्यातून चौकीत येणारा प्रत्येक जण निर्जंतुक होण्यास मदत होत आहे.