औरंगाबाद : दुपारपर्यंत २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि एका कोरोनामुक्त युवकास रुग्णालयातून सुटी या दिवसभरातील दोन दिलासादायक वृत्तानंतर शुक्रवारी सायंकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०९ झाली आहे.
शहरात शुक्रवारी संध्याकाळी ३२ नव्या रुग्णांची भर पडली. यात संजय नगर- मुकुंदवाडी -१८, नूर कॉलनी ३, वडगाव १, आसिफिया कॉलनी ३, भडकल गेट १ , गुलाबवाडी- पदमपुरा २, सिटी चौक १, मेहमूदपुरा १ , जय भीमनगर (टाऊन हॉल) २ अशी रुग्ण संख्या असल्याची माहिती माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
नव्या ठिकाणांची भरगुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही संजयनगर-मुकुंदवाडीत १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. वडगाव, भडकलगेट, गुलाबवाडी-पदमपुरा, मेहमूदपुरा या भागातही कोरोनाने आता शिरकाव केला आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारपर्यंत कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल २९२ अहवाल निगेटिव्ह आले आणि एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असल्याने थोडा दिलासा मिळाला होता यात आणखी ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.