औरंगाबाद : कोरोनाच्या गंभीर रुग्णांत हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू हे प्रामुख्याने आढळत आहेत. या आजारांमुळे कोरोनाचे स्वरूप गंभीर होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.
कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. त्याच वेळी दुसरीकडे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांत इतर आजारही प्रामुख्याने असल्याचे समोर आले आहे. यात मधुमेह, रक्तदाब यासह हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू हे चार गंभीर आजार असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
या गंभीर आजारांमुळे कोरोनाचा विळखा घट्ट होऊन मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे कोरोनाबरोबर अन्य आजारही मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना संसर्गाचा सर्वात मोठा धोका हा कमी रोगप्रतिकारशक्ती व कमकुवत शरीर असलेल्या व्यक्तींना आहे. वयोवृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना जास्त धोका असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुस तसेच मूत्रपिंडाचा आजार यासारख्या व्याधी असणाऱ्या नागरिकांनासुद्धा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. हे आजार असतील तर ते जिवावर बेतण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या आजारांच्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
गंभीर रुग्णही बरे होतातकोरोनाच्या गंभीर रुग्णांत चार प्रमुख आजार आढळून आले आहेत. हृदयविकार, मूत्रपिंडविकार, कर्करोग आणि अर्धांगवायू या चार प्रमुख रुग्णांत कोरोना आढळून आला आहे. विशेष म्हणजे ५९ वर्षीय कर्करोगाचा रुग्ण बरा होऊन गेलेला आहे. - डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक.