औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) ५६ वर्षीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा गुरुवारी रात्री १०.५५ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. २१ जुलैला त्यांना घाटीत भरती करण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी आणि न्यूमोनिया मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटीकडून सांगण्यात आले.
घाटीतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे हा दुसरा मृत्यू आहे. तर ५३ हुन अधिक डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका आतापर्यंत बाधित आढळून आले आहेत. त्यातील ९ बाधितांवर सध्या घाटीत उपचार सुरू असल्याचे घाटीकडून सांगण्यात आले. तसेच संघर्ष नगर येथील ५५ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, हडको येथील ७६ वर्षीय पुरुष, क्रांती नगर येथील ६७ वर्षीय पुरुष या बाधितांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित ८९ रुग्णांची वाढजिल्ह्यातील ७४ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आले. आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील ५९, ग्रामीण भागातील २५ तर सिटी एंट्री पाँइंटवरील ५ बाधितांचा समावेश आहे. तर पाच बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १२४३६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ७१७८ बरे झाले, ४३१ जणांचा मृत्यू झाला. तर ४८२७ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.