औरंगाबाद : सचखंड एक्स्प्रेसने बुधवारी औरंगाबादेत आलेल्या एका प्रवाशाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आणखी एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर गेल्या ४ दिवसांपासून अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. पहिल्या दोन दिवसांत केलेल्या तपासणीत चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मंगळवारी सचखंड एक्स्प्रेसने आलेले २५ प्रवासी आणि आरपीएफ, रेल्वे कर्मचारी आशा ३० जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु बुधवारी एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्याबरोबरच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तब्बल दोन महिन्यांनंतर १ जूनपासून सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली होती. पहिल्यांदाच या रेल्वेने आलेला प्रवासी कोरोना बाधित आढळून आला.