सिल्लोड: तालुक्यातील तळणी येथील क्वारंटाईन केलेल्या एका २७ वर्षीय युवकाने खदानीतील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून शनिवारी सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाने युवकाचा मृतदेह शोधून काढला. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव पंजाब सुंदरसिंग ठाकूर असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंजाब ठाकूर हा औरंगाबाद येथून तळणी येथे घरी आला असता त्याला कुटुंबाने शेतात क्वारंटाईन केले. शुक्रवारी दुपारी पंजाब भावासह दुचाकीवरून तळणी शिवारातील मंदिराकडे जात होता. यावेळी अचानक दुचाकी उभी करुण पंजाबने रस्त्यालगतच्या खदानीतील पाण्यात उडी मारली. उडी मारताच त्याच्या भावाने आरडा- ओरड केली. शेजारील शेतकरी मदतीला धावुन येईपर्यंत पंजाब पाण्याच्या तळाशी बुडाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण बिडवे, विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने बराच शोध घेतला, पण पाणी आधीक खोलवर असल्याने रात्री उशिरा पर्यंत मृतदेह मिळून आला नव्हता.
अग्निशमनदलास पाचारण यंदा तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने सर्व जलसाठे तुडुंब भरले होते. यामुळे खदानीतही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून मृतदेह सापडण्यास अडचण येत आहे. पोलिसांनी अग्निशमन दलास पाचारण केले. शनिवार सकाळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 8 वाजेच्या दरम्यान पथकाला मृत्यूदेह शोधण्यास यश आले. यावेळी अग्निशामक दलाचे मोहन मुंगसे, सुभाष दुधे, परेश दूधे, प्रसाद शिंदे, इरफान पठान, विक्रम भुईगल, किरण पागोरे,तुषार तौर, दिनेश मूंगसे यांनी परिश्रम घेतले.
आत्महत्येचे कारण कळाले नाही सदर युवक आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद येथुन तळणी गावात आला होता. औरंगाबाद येथून आल्याने त्याची आरोग्य तपासणी करून कुटुंबाने त्यास होम क्वारंटाईन केले होते. दर्शनाला जाताना अचानक त्याने पाण्यात उडी घेतली यामुळे नेमके आत्महत्येचे कारण कळाले नाही. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.