औरंगाबाद : कोरोना रुग्णांना ४४ लाख ७७ हजार १३१ रुपयांचे बेहिशोबी बिल आकारणाऱ्या १४ खाजगी हॉस्पिटल्सना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत मुदतीत खुलासा करण्याची तंबी प्रशासनाने संबंधित हॉस्पिटल्सना दिली आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, २५ लाख रुपयांची अतिरिक्त बिलांची वसुली करून ती रुग्णांना परत केली आहे. आज ४४ लाख रुपयांच्या नोटीस दिल्या आहेत. ज्यांनी जास्तीचे बिल आकारले, सामान्यांची लूट केली असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. यातून किमान ३५ लाख रुपयांची वसुली तरी होईल.
दरम्यान उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले, शहरातील १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी जास्त रकमेची आकारणी केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयांना नोटिसारुग्णालयांना कोरोना रुग्णांकडून अधिक बिल घेतल्यासंबंधी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कृष्णा हॉस्पिटल- ३० लाख ८७ हजार ५०० रुपये, ग्लोबल इंटरनॅशनल हॉस्पिटल - ३ लाख ९९ हजार रुपये, धूत हॉस्पिटल- ६ लाख ८८ हजार १८३ रुपये, हेडगेवार हॉस्पिटल- २९ हजार ६४ रुपये, सुमनांजली हॉस्पिटल - ८११३, आशिष हॉस्पिटल - ७० हजार ४००, धनवई हॉस्पिटल - १२२००, मेडिकव्हर हॉस्पिटल - ४९ हजार २७१, सनशाईन हॉस्पिटल - ५६ हजार ५०० रुपये , ओरियन सिटी केअर हॉस्पिटल- ३९ हजार ४००, ईश्वर हॉस्पिटल - १६ हजार, एशियन हॉस्पिटल - ५९०० रुपये , अजंठा हॉस्पिटल - ११ हजार रुपये, वायएसके हॉस्पिटल - ४६०० रुपये.