औरंगाबाद : कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय मंगळवारी महापालिका प्रशासनाने घेतला. नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी १० स्वतंत्र मोबाईल पथक नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. तपासणीसाठी पुढील पंधरा दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केली.
महापालिकेत मंगळवारी दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे तेथे मोबाईल व्हॅनद्वारे लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत. हाय रिस्क असलेल्या रुग्णाचे नमुने घेऊन त्याला त्वरित महापालिकेच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. लो रिस्क रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन त्याला घरातच अलगीकरण करून ठेवण्यात येईल. या कामासाठी महापालिकेच्या १० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. एका पथकात डॉक्टर आणि आणखीन चार कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केल्यास समूह संसर्ग होणार नाही, असा विश्वास प्रशासनाला आहे.
बैठकीतील ठळक निर्णय- वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी परिपत्रक काढून निश्चित करावी. यामध्ये कॉन्टॅक्ट मॅपिंग(संशयितांचा शोध घेणे), चाचण्या करणे, रुग्णांना हलवणे, कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण इत्यादी.
- ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या लाळेचे नमुने घ्यावेत. - स्वॅब कलेक्शन आपल्या दारी हे अभियान राबवून संशयितांचे लाळेचे नमुने जागेवरच घ्यावे. ज्या भागात लाळेचे नमुने घ्यायचे आहेत त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे.- गर्दी न करता एक एक माणूस बोलवून त्यांचे लाळाचे नमुने घ्यावे. - ज्या शहर बसने रुग्णांची ने- आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल असा स्वॅब कलेक्शन आपल्या दारी असा बोर्ड लावावा.- प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत ‘‘कोरोना प्रतिबंधक समिती’’ करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करावे. - प्लाझ्मा थेरपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता इत्यादी तपशिलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवावे.