औरंगाबाद : शहरातील पीर बाजार येथील एक आणि वैजापूर व फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची आतापर्यंतची संख्या २०६ वर गेली आहे.
कोरोना बाधित वैजापूर तालुक्यातील वंजारगाव येथील ६६ वर्षीय वृद्धाचा सोमवारी दुपारी साडेतीन वाजता, पिर बाजार येथील ८६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दुपारी साडेचार तर ६० वर्षीय फुलंब्री तालुक्यातील व्यक्तीचा रात्री साडे आठ वाजता घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. कोरनामुळे तीव्र श्वसन विकार व न्यूमोनिया मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
मंगळवारी विक्रमी १६३ रुग्णांची भर जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात आतापर्यंतची रेकोर्ड ब्रेक रुग्णांची वाढ झाली. तब्बल १६३ रुग्णांची भर पडून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. वाढलेल्या रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येचा रोज नवा उच्चाक गाठला जात असून मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोना संक्रमण चिंतादायी बनले आहे.