औरंगाबाद : हॅलो.. मी सुरेश पुरी बोलतोय. समोरून विद्यार्थी नमस्कार सर. कसं काय फोन केला. असा प्रश्न विचारतो. त्यावर सर सांगतात... ‘अरे बाबा सध्या कोरोनात आम्ही घरी बसलोत. फिल्डवर तुम्ही काम करता. तुमची काळजी वाटते म्हणून फोन केला. कुटुंबासह स्वत:ची काळजी घेऊन काम करा... हा काळही निघून जाईल. पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील’, असे मायेचे शब्द बोलून हा आईमनाचा माणूस फोन ठेवतो. हा उपक्रम मागील काही दिवसांपासून दररोज सकाळ- संध्याकाळ दोन तास सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांना जनसंपर्कतज्ज्ञ म्हणून सर्व जण ओळखतात. त्यांचा विद्यार्थी परिवार देशभर पसरलेला आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावलेला असल्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांना बापाच्या स्थानी मानतात.१९८१ साली विद्यापीठातील वृत्तपत्र विभागात रुजू झाल्यापासून ३१ मे २०१० रोजी निवृत्त होईपर्यंत ३० वर्षांच्या कालखंडात पत्रकारितेच्या शेकडो विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे त्यांनी प्रेम दिले.पत्रकारिता विभागात शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते, लाडके शिक्षक प्रा. सुरेश पुरी होत. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे अतिशय गरीब कुटुंबातील असतात. या विद्यार्थ्यांना कधी पैसे कमी पडतात, कधी जेवणाचे वांधे होते. तेव्हा विद्यार्थी हक्काने पुरी सरांकडे जाऊन समस्या सांगत आणि पुरी सर त्याचे पालकत्व स्वीकारत. शिक्षण पूर्ण होईपर्यंत मदत करत. विद्यापीठातील सराच्या क्वॉर्टरमध्ये सकाळी चहा- नाष्टा आणि दैनिके वाचण्यासाठी हॉल भरलेला असे. ३१ मे २०१० रोजी प्रा. पुरी सर सेवानिवृत्त झाल्यानंतर बीड बायपास परिसरात राहण्यासाठी गेले. त्याठिकाणीही विद्यार्थी जात. सरांनी सेवानिवृत्तीनंतर हिंदी भाषिक सभेचे काम सुरू केल्यामुळे हैदराबादलाच मुक्काम हलवला होता.
मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच सर औरंगाबादेत पोहोचले. या लॉकडाऊनमध्ये प्रा. पुरी सरांचे पत्रकारितेत कार्यरत असलेले शेकडो विद्यार्थी फिल्डवर राहून बातम्या देण्याचे काम करीत आहेत.सर्व जण घरात असताना त्यांचा विद्यार्थी रस्त्यावर काम करीत असल्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास फोन करून सर विचारपूस करतात. काळजी घ्या, कुटुंबाला जपा आणि व्यवस्थित कामही करा, असा सल्ला देतात. काही अडचण असल्यास सांगा, हे विचारायलाही प्रा. पुरी सर विसरत नाहीत. अशा बाप मनाच्या माणसाचा फोन आल्यानंतर विद्यार्थीही भारावून जात आहेत.
सरांचे विद्यार्थी दिल्ली ते हैदराबादप्रा. सुरेश पुरी सरांचे विद्यार्थी गल्ली ते दिल्लीपर्यंत पत्रकारितेत कार्यरत आहेत. दिल्ली, हरियाणा, गोवा, हैदराबाद, तेलंगणा, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, वर्धा, बुलडाणा अशा विविध शहरांमध्ये प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन केले आहेत. सुरुवातीला प्रा.पुरी यांनी त्यांचे गुरू, मित्रमंडळी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना फोन लावले. औरंगाबाद शहराबाहेरील त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांचे फोन लावून झाले असून, मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरातील विद्यार्थ्यांना फोन लावत असल्याचे प्रा. पुरी सर यांनी सांगितले.