औरंगाबाद : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने शनिवार (२१ मार्च) व रविवार (२२ मार्च) रोजी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यातून औषधी व्यावसायिकांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.
चिकलठाण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पालकत्वही महासंघाने स्वीकारले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यासाठी तिथे खाटापासून वैद्यकीय साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेण्यात आल्याचेही त्यांनी दिली. कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघ प्रशासनासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. यासंदर्भात महासंघाची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यात शहरातील ७२ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव सहभागी झाले होते. या बैठकीत कोरोनासंदर्भात प्रशासनाला कशा प्रकारे मदत करता येईल, याविषयी सर्वांनी आपले विचार मांडले.
यावेळी महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, कॅमिटचे मराठवाडाचे उपाध्यक्ष अजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. व्यापारी महासंघही प्रशासनाच्या सोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. या बंदमध्ये २५ हजार व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. या बंदमधून औषधी विक्रेत्यांना वगळण्यात आले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्यात येईल.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे गरजेनुसार खाटांची व्यवस्था करणे, विशेष कक्ष तयार करणे, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणे आदींची जबाबदारी जिल्हा व्यापारी महासंघाने घेतल्याचेही काळे यांनी सांगितले. या बैठकीला सचिव लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, विजय जैस्वाल, जयंत देवळाणकर, गुलाम हक्काणी, कचरू वेळजकर यांच्यासह ७२ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, सचिव हजर होते.
बाजारपेठेत ५० ठिकाणी लिक्विड वॉश सोपची व्यवस्था जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शहरातील विविध भागांतील ५० ठिकाणी लिक्विड वॉश सोप आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना आपले हात धुता येतील. यात पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, सिटीचौक, शाहगंज, क्रांतीचौक, उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, सिडको हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, हर्सूल आदी भागांचा समावेश असणार आहे. लिक्विड वॉश सोप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या भागातील व्यापारी संघटनांवर सोपविण्यात आली आहे.