औरंगाबाद : दहा एप्रिलला माझा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयात भरती होतो. रक्तातील आॅक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने अत्यवस्थ परिस्थितीत घाटीत भरती झालो. इथे १९ दिवसांच्या उपचाराने कोरोनामुक्त होऊन मला नवे जिवदान मिळाले. २७ दिवसानंतर घरी जातोय. लढण्याची जिद्द ठेवली तर या आजारातून बाहेर येता येते, मी लढलो, डॉक्टरांवर विश्वास ठेवला. त्यांचे ऐकले म्हणून जिंकलो. घाटीचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. हे सांगतांना भावुक झालेला समतानगर येथील ३८ वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने डॉक्टरांचे पाय धरले होते.
कोरोनाच्या रुग्णांच्या गंभीर रुग्णांसाठी घाटी रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हीड हाॅस्पीटल सुरु झाले. तेव्हापासून या ना त्या कारणांनी घाटीत दहा रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद झाली. म्हणून टिकेचेही धनी व्हावे लागले. मात्र, १९ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एमआयसीयूत भरती समतानगर येथील 38 वर्षीय गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्या रुग्णाला घरी रवाना करतांना फुलांची उधळण आणि पुष्पगुच्छ देवून रवाना करतांना डाॅक्टर, परिचारीका कर्मचार्यांमध्ये उत्साह होता. हा क्षण काहीसा भावूकही झाला होता. रुग्णाने घरी परतांना घाटीने नवे जिवदान दिल्याची भावना लोकमतकडे व्यक्त केली.
अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य, उपाधिष्ठाता डाॅ. कैलास झिने, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. प्रभाकर जिरवणकर, मेट्रेन विमल केदारे, इनचार्ज महेंद्र साळवे, मुजम्मील पठाण, कैलास चिंतळे यांच्या उपस्थितीत रुग्णाला १०८ रुग्णावाहीकेने रवाना करण्यात आले. यावेळी घाटीकडून घरी सोडण्यासाठी शेख सोहेलही रुग्णासोबत गेले होते. अधिष्ठाता डाॅ. येळीकर यांनी मेडीसीन विभागाचे यावेळी काैतूक केले. तर रुग्णाला भेटी गाठी टाळून सकस आहार व अलगीकरणात राहण्याच्या सुचना दिल्या. चार व सहा मे ला त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटी देण्यात आल्याचे डॉ येळीकर म्हणाल्या. डाॅ. अविनाश मुंडे, डाॅ. अलिम पटेल, डाॅ. संदेश मालु, ब्रदर प्रतिक जोशी, रोहीणी ठाकरे, हेमलता शिरसाट, संजीवनी वाहेकर यांनी रुग्णाची एमआयसीयू सुश्रुषा केली.