औरंगाबाद : कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शन्सची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्रालयाकडे, तसेच इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना उपाययोजनांबाबतच्या तिसऱ्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सद्य:स्थितीत इंजेक्शन्सची मागणी जास्त आहे. इंजेक्शन्सचे उत्पादन फक्त एकच कंपनी करीत असल्याने तुटवडा जाणवत आहे. ते इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी यंत्रणेद्वारे प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच कोरोना उपचारासाठी उपयुक्त प्लाझ्मा थेरपी घाटीत सुरू करण्यासाठीच्या तांत्रिक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे. जेणेकरून प्लाझ्मा बँक तयार ठेवता येईल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
प्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरूकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण व अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळावी, यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे चौधरी म्हणाले. बैठकीत खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. सतीश चव्हाण, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद सहभागी झाले.