औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. आगामी तीन महिन्यांसाठी ७७ कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात ८ कोटी ९२ लाख रुपयांची जुनी थकबाकी आहे. आतापर्यंत महापालिकेला ४७ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाची दमछाक झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या खूपच वाढली होती. कोविड केअर सेंटरमध्ये अपुरे पडत होते.
कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करून दहा दिवस उपचार करणे, त्यांच्या जेवणासह इतर व्यवस्था केली जात आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेला आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ३७ कोटी ३६ लाख, तर जिल्हा नियोजन समितीमार्फत १० कोटी १२ लाख असा एकूण ४७ कोटी ४८ लाख रुपये निधी मिळाला आहे. महापालिकेला अद्याप ८ कोटी ९२ लाख रुपयांची बिले अदा करायची आहेत. राज्य शासनाला आगामी तीन महिन्यांसाठी ७७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
--------
कोविड केअर सेंटरवर २५ कोंटीचा खर्च
प्रस्तावात कोविड केअर सेंटरवर आतापर्यंत झालेल्या खर्चाचादेखील समावेश आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागात शासकीय इमारतींसह काही संस्थांच्या इमारती ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू केले होते. यातील काही संस्थांनी इमारतीचे भाडे व लाईट बिल मिळावे, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. तसेच महापालिकेच्या इमारतींमध्ये काही दुरुस्त्या करून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च झाला आहे.
--------
अंत्यसंस्कारासाठी पाच कोटी
कोरोनात शहरासह इतर जिल्ह्यातून कोरोनाबाधित नागरिक उपचारासाठी शहरात आले. यातील काहींचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातच मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे काम एका बचतगटाला देण्यात आले आहे. एका संस्थेने मोफत काम केले. अंत्यसंस्कारावर आतापर्यंत दीड कोटींचा खर्च झाला आहे. या दीड कोटींसह आगामी काळात निधीची गरज म्हणून ५ कोटी रुपये शासनाकडे मागण्यात आले आहेत. तीन कोटीची यंत्रसामग्रीदेखील खरेदी केली जाणार आहे.
-----------------