औरंगाबाद : शहरातील १३ आरोग्य केंद्रांवर मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे. महापालिकेकडे फक्त १,५०० लस शिल्लक आहे. सोमवारी दिवसभरात १,३४४ नागरिकांना लस देण्यात आली.
शहरात मनपाने ११५ कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केली असून, आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६२३ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या लसीचा तुटवडा जाणवत असून, मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यास अडचणी येत आहेत. तरीदेखील मनपाकडून लसीकरण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी १३ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मंगळवारी लसीकरणासाठी कोविशिल्ड लसीचे ८८० आणि कोव्हॅक्सिन लसीचे ६२० डोस असे एकूण १,५०० डोस उपलब्ध आहेत. लस कमी असल्यामुळे १३ आरोग्य केंद्रांवरच लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.