केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दी इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रीटस् फॉर पीपल’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश शहरातील रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कोरोना संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणे हा आहे. यासाठी पालिका प्रशासक तथा आयुक्त आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी कंपनी पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा स्ट्रीटस् फॉर पीपल प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. १३ नोव्हेंबरला सर्वप्रथम पैठणगेट येथे ‘स्ट्रीटस् फॉर पीपल’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) स्नेहा मोहन नायर यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमधील आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. प्रकल्पासाठी विविध मापदंडाआधारे रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित जागांची निर्मिती, सौंदर्यीकरण आणि आर्थिक प्रगतीचा विचार करण्यात आला आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
हा उपक्रम राबविताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ नोव्हेंबरला शास्त्रीय संगीत, ओपन स्केचिंग इव्हेंट होणार आहे. ज्यात नागरिकांना औरंगाबादच्या ऐतिहासिक स्थळांचे रेखाटन आणि पथनाट्य सादर करण्याचे आवाहन एएससीडीसीएलच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी केले आहे. संगीताच्या कार्यक्रमात गजानन केचे, निरंजन भालेराव, गजन धुमाळ, गणेश भुतेकर, अरविंदकुमार आणि संदीप तेपाळे सहभागी होत आहेत, तर वसंतराव नाईक बालगृहाचे विद्यार्थी आकर्षक रांगोळी, डिझाईन तयार करून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.