लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता कर थकल्यामुळे महानगरपालिकेने शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकातील आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयास टाळे ठोकले. रकमेविषयी हमीपत्र (अंडरटेकिंग) दिल्यानंतर काही वेळेने हे टाळे काढण्यात आले. परंतु या प्रकारामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाने महापालिकेला शहर बससेवेपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम मागण्याची तयारी केली आहे.महापालिकेचे करनिरीक्षक आणि इतर कर्मचा-यांचा ताफा शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकातील आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात पोहोचले. ४ लाख १५ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकल्याने निरीक्षकांनी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयातील एका कक्षाला टाळे ठोकले. यामुळे येथील कामकाज विस्कळीत झाले. यासंदर्भात वरिष्ठ अधिका-यांनी महापालिकेच्या अधिकारी-पदाधिका-यांशी संपर्क साधला.याविषयी माहिती मिळताच विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार बसस्थानकात पोहोचले. त्यांनी पथकासोबत चर्चा केली. थकीत कराच्या रकमेत तफावत असल्याचा मुद्याही उपस्थित झाला. रकमेविषयी हमीपत्र देण्यात आल्यानंतर टाळे काढण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितली.
आगार व्यवस्थापकांच्या कक्षास महानगरपालिकेने ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:13 AM