---
औरंगाबाद ः शैक्षणिक पात्रता नसतांना बोगस बंगाली डाॅक्टर चिकलठाणा परिसरात मूळव्याध, भगंदरसह विविध आजारांवर उपचार करत असल्याच्या तक्रारी मनपाच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बोगस डॉक्टर व्यावसायिक शोध समितीने चाैकशी अंती बोगस आढळलेल्या डाॅ. नयन ढाली यांच्याविरोधात चिकलठाणा पोलिसांत फसवणुकीसह वैद्यकीय व्यावसायिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाकडून बुधवारी देण्यात आली.
मनपाने दिलेल्या माहितीनुसार, चिकलठाणा परिसरात सावित्रीनगरात दुर्गामाता दवाखाना सुरू करून डॉ. नयन ढाली या रूग्णांवर उपचार करत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने चिकलठाणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी स्थळ पाहणी करून डॉ. ढाली यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी केली. चौकशी अहवाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे सादर केला.
बोगस डॉक्टर व्यावसायिक शोध समितीची मनपा प्रशासक पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबरला झालेल्या बैठकीत यासंबंधी सर्व बाबी तपासण्यात आल्या. बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियमाच्या विविध कलमान्वये डॉ. अर्चना राणे यांनी बोगस डॉक्टर नयन ढाली यांच्याविरोधात मंगळवारी चिकलठाणा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.