औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश खंडपीठाने अनेकदा मनपा प्रशासनाला दिले. त्यानंतरही शहरात राजरोसपणे चौकाचौकांत मोठ-मोठे होर्डिंग्ज लावण्यात येतात. शहर विद्रुपीकरणाला पाठबळ देणारे होर्डिंग्ज काढले तर मनपातील राजकीय मंडळी प्रशासनावर दबाव टाकत असत. आता मनपात सत्ताधारी नसतानाही होर्डिंग्ज झळकत आहेत. शुक्रवारी अचानक मनपा प्रशासनाने जालना रोड, टी.व्ही. सेंटर भागात ‘काढ रे ते होर्डिंग’ मोहीम राबविली. दिवसरात्र लहान मोठे मिळून तब्बल ६६ होर्डिंग्ज जप्त करण्यात आले.
महापालिकेने परवानगी दिलेल्या ठिकाणीच होर्डिंग्ज लावले गेले पाहिजेत. रस्त्याच्या कडेला, चौकात अनधिकृत होर्डिंग्ज लागता कामा नये, अशी सूचना यापूर्वीच खंडपीठाने महापालिकेला दिली. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणत्या दिवशी होर्डिंग्ज लावावेत यासंबंधीचा ठरावही मंजूर करण्यात आला. वर्षभरातून ३४ दिवस परवानगी घेऊन होर्डिंग लावावेत, असा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. वर्षभर विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संघटना सोयीनुसार अनधिकृत होर्डिंग्ज लावतात. महापालिकेनेही मागील दीड ते दोन वर्षांत होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर काढण्याची मोहीम राबविली नाही. शुक्रवारी सकाळी अचानक अतिक्रमण हटाव पथकाला शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली. जालना रोडनंतर महापालिकेचा ताफा टी.व्ही. सेंटर भागात गेला. तेथीही चौकाचौकात २० ते २५ फूट उंच होर्डिंग काढण्यात आले. दोन ट्रक भरून हे होर्डिंग जप्त केले. दिवसभरात ६६ लहान मोठे हाेर्डिंग जप्त केले. अनेक ठिकाणी झेंडेही जप्त केल्याची माहिती अतिक्रमण हटाव विभागाने दिली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक मजहर अली, पंडित गवळी, भास्कर सुरासे, आदींनी केली.
युवा सेनेचेही होर्डिंग्ज काढले
शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आले. त्यांच्या स्वागतासाठी जालना रोडवर सर्वाधिक होर्डिंग्ज लावण्यात आले होते. महापालिकेच्या पथकाने सर्व होर्डिंग्ज काढले.
राजकीय नेत्यांचे सतत फोन
जालना रोड, टी.व्ही. सेंटर भागात लावण्यात आलेले हजारो रुपयांचे होर्डिंग काढू नयेत म्हणून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राजकीय नेत्यांचे फोन सतत येत होते. मात्र, प्रत्येकाला हो, बघतो म्हणून कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.