लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांची नावे पक्षश्रेष्ठींनी सूचविल्यानंतर या नावाला विरोध करीत स्थानिक नगरसेवकांनी बंड पुकारले असून शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत हे नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.परभणी महानगरपालिकेत संख्यीय बळानुसार व लॉटरी पद्धतीत मिळालेल्या संधीनुसार काँग्रेस पक्षाच्या वाट्याला तीन स्वीकृत सदस्यपदे आली आहेत. १५ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी काँग्रेसमध्ये या पदासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता ३ नोव्हेंबर रोजी या संदर्भात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून या संदर्भातील प्रक्रिया गतीमान झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी रविवार व सोमवार त्यानंतर गुरुवारी असे तीन दिवस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची नांदेड येथे भेट घेतली. प्रत्येक गटाने आपली नावे त्यांच्याकडे सोपविली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अंतिम नावे अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जिल्हा प्रभारींकडून कळविण्यात येतील, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ११ ते २ या वेळात काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या तीन व भाजपाच्या वाट्याला आलेल्या १ अशा चार सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. तत्पूर्वी दुपारी १.४५ वाजता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, प्रदेश सरचिटणीस लियाकत अली अन्सारी व उपमहापौर माजूलाला समर्थक मेहराज कुरेशी या तिघांची नावे स्वीकृत सदस्यपदासाठी गटनेते भगवान वाघमारे यांच्याकडे मेलच्या माध्यमातून पाठविली. त्यानंतर एकच गजहब झाला. कारण, काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी दिलेल्या नावांपैकी काही नावे ही अनपेक्षित असल्याने नगरसेवकांमध्ये चलबीचल सुरु झाली. अशातच या तीन सदस्यांचे अर्ज प्रशासनाकडे दाखल करु नयेत, यासाठीही प्रयत्न सुरु झाले. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भगवान वाघमारे यांनी तिन्ही सदस्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन वेळेत आयुक्तांकडे दाखल केले. त्यानंतर प्रारंभी बी.रघुनाथ सभागृह परिसरात व त्यानंतर मनपात महापौर मीनाताई वरपूडकर, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख यांच्या कक्षामध्ये नाराजांच्या बैठकांचा रतीब सुरु झाला. काही नगरसेवकांनी स्थानिक नेत्यांना विचारात न घेता नावे जाहीर केली. त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊत, अशी भूमिका घेतली. पक्षाचे मनपातील सर्वच्या सर्व म्हणजे ३२ नगरसेवक राजीनामा देतील, असेही यावेळी सांगण्यात आले. तर काही नगरसेवकांनी राजीनामे देण्याऐवजी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेस गैरहजर राहण्याचा मुद्दा मांडला. त्यालाही काहींनी होकार दिला. याबाबत पक्षश्रेष्ठींना तातडीने पत्र पाठवूत, अशीही चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र कोणतेही पत्र पक्षश्रेष्ठींना पाठविले गेले नाही. परंतु, नगरसेवकांची नाराजी मात्र वरिष्ठांपर्यंत कळविण्यात आली. सायंकाळी ५.३० पर्यंत या बैठका चालल्या. त्यानंतर सर्वच नगरसेवक व पदाधिकारी मनपातून निघून गेले.दरम्यान, दुपारनंतर मनपात घडलेल्या घडामोडींमुळे शुक्रवारची सर्वसाधारण सभा होणार का? व या सर्वसाधारण सभेत पक्षश्रेष्ठींनी सूचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब होते की पक्षश्रेष्ठींविरुद्ध पुकारलेले नगरसेवकांचे बंड यशस्वी होते, याविषयी राजकीय वर्तूळात प्रचंड उत्सुकता लागली आहे. मनपा निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली असली तरी तीन स्वीकृत सदस्यांवरुन थेट पक्षश्रेष्ठींना विरोध करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतल्यामुळे काँग्रेसमधील बंडाळी समोर आली आहे. स्थानिक नगरसेवकांना डावलून पक्षश्रेष्ठींनी नावे सूचविली असतील तर त्यामागे कोण आहे, याविषयीदेखील चर्चा होऊ लागली आहे. दुसरीकडे स्थानिक नगरसेवकांनी तीनपैकी ज्या नावांना विरोध दर्शविला आहे, त्याचे कारण काय? ते इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आली की त्यांचे पक्षासाठी योगदानच नाही की इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करुन त्यांची नावे पुढे करण्यात आली, असे अनेक प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडले आहेत.
पक्षश्रेष्ठीविरुद्ध नगरसेवकांचे बंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:27 AM