कळंब : कळंब नगर परिषदेने केलेली मिनी गाळ्यांची भाडेवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी न.प. कार्यालयात गेलेल्या व्यापारी व नगरसेवकांमध्ये मंगळवारी शाब्दीक चकमक उडाली. यामुळे व्यापाऱ्यांना निवेदन न देताच परतावे लागले.नगर परिषदेने १ मार्च २०१४ रोजी घेतलेल्या ठरावानुसार शहरातील न.प. ने उभारलेल्या मिनी गाळ्यांच्या अनामत रक्कमेमध्ये ५० टक्के व भाड्यांमध्ये ५० टक्के वाढीचा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे न.प. ने शहरातील ७१ गाळेधारकांना ही रक्कम सात दिवसाच्या आत न.प. कडे जमा करण्याची नोटीस ६ सप्टेंबर रोजी बजावली होती. या भाडेवाढ सध्याच्या परिस्थितीत अडचणीची असल्याने ती मागे घ्यावी, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही व्यापारी निवेदन घेवून मुख्याधिकाऱ्यांना भेटावयास गेले होते. मुख्याधिकारी कक्षात नसल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. त्यावेळी उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी व नगरसेवक शिवाजी कापसे यांनी व्यापाऱ्यांच्या या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली. ही भाडेवाढ नियमानुसार असल्याने तुम्ही न.प. मध्ये येण्याची आवश्यकता नव्हती, असे त्यांनी सांगितले. या मुद्यावरुन काही व्यापारी व नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. काही जणांना कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने न.प. इमारतीखाली उतरविण्यात आले. न.प. मध्ये मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने या व्यापाऱ्यांचे निवेदनही कोणी स्विकारले नाही.व्यापाऱ्यांनीही धीर सोडलान.प. च्या भाडेवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी मिनी गाळेधारकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. न.प. मध्ये हा प्रकार घडल्यानंतर न.प. च्या काही कर्मचाऱ्यांनी या भागात फिरुन बंद व चालू दुकानांची यादी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना विरोध नको म्हणून व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने उघडली. सत्ताधाऱ्यांचे हे दबावतंत्र चांगलेच कामाला आल्याची चर्चा आज शहरात होती. (वार्ताहर)
नगरसेवक -व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
By admin | Published: September 11, 2014 12:35 AM