औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने नेमलेल्या कंपनीने महापालिकेला सादर केलेले बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत.
मागील काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कचरा संकलनाचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून करून घेत होते. दरवर्षी कचरा संकलन आणि वाहतुकीचा खर्च तब्बल ६० कोटींपर्यंत जात होता. या कामात सुसूत्रता यावी, खर्च कमी व्हावा, या हेतूने मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची कचरा संकलनासाठी नेमणूक केली आहे. या कंपनीने सादर केलेले तीन महिन्यांतील बिल दीड कोटींपर्यंत पोहोचले आहे. कंपनीच्या कामामुळे मनपाचे १ कोटी २२ लाख रुपये वाचले आहेत.
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी कंपनीची नियुक्ती केली आहे. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीमुळे १ कोटी २२ लाख रुपये वाचल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी घनकचरा व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेची बचत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कंपनीतर्फे शहरात फक्त सहा प्रभागांत काम केले जात आहे. दररोज दोनशे ते अडीचशे टन कचरा कंपनी संकलन करते व तो कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेते. गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे महापालिकेकडे दीड कोटी रुपयांचे बिल थकीत आहे. हेच काम महापालिकेतर्फे खासगी वाहने लावून केले असते, तर १ कोटी २२ लाख रुपये खर्च येत होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. ८० लाख रुपयांचे पेट्रोल - डिझेल, तर ४० लाख रुपये मजुरांवरील खर्चापोटी वाचल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनीमुळे खर्च वाढला, असे एकाही अधिकाऱ्याने सांगितले नाही.