औरंगाबाद : पत्नीचा खून करणाऱ्या सिद्धेश त्रिवेदीला आता पश्चात्ताप होत असून, ही भावना त्याने सासरे जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहोणेर, जि. नाशिक) यांना पत्र पाठवून व्यक्त केली. तो म्हणतो, ‘मी आपला चांगला जावई होऊ शकलो नाही. माझ्या अंगात काय संचारले होते, तेच मला कळाले नाही. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माफ करा’.
चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, हवालदार रवींद्र साळवे, दीपक सुराशे व एस. बी. घुगे यांच्या पथकाने सिद्धेशला शनिवारी दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशातून अटक करून आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री सिद्धेश त्रिवेदीने पत्नीला डोक्यात डंबेल्सने प्रहार करून मारून टाकले व दोन लहान मुलांना मृत आईजवळ सोडून तो दरवाजाला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. जाताना त्याने अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आपली स्कूटी घेतली व त्यावरून तो थेट पुण्याला गेला. तिथे विमानतळाच्या पार्किंगमध्ये स्कूटी उभी करून विमानाने तो दिल्लीला गेला.
प्लॉट खरेदी करण्यासाठी सिद्धेशने ९५ हजारांत पत्नीचे दागिने मोडले होते. त्यातील काही पैसे त्याने कपाटात ठेवले होते. ते पत्नी कविताच्या हाती लागले; पण कपाटातील दागिने गायब होते. याचा जाब कविताने विचारल्यामुळे दोघांत कडाक्याचे भांडण जुंपले. काही केल्या कविता ऐकत नाही, हे लक्षात येताच त्याने बाजूला पडलेला डंबेल तिच्या डोक्यात मारला. ती निपचित पडताच तो घरातून पळून गेला. आता त्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असून, औरंगाबादेत राहणाऱ्या त्याच्या सावत्र भावाला त्याने पत्र लिहून ‘मी तुमच्यासोबत भावासारखा वागलो नाही’, असे कळविले. त्यानंतर त्याने सासऱ्याकडेही पत्राद्वारेच पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.
महिनाभर कुठे होता सिद्धेशपत्नीचा खून केल्यानंतर तो स्कूटीवरून थेट पुण्याला गेला. तेथून विमानाने तो दिल्लीला गेला. तेथे काही दिवस तो थांबला. मात्र, पोलीस पकडतील म्हणून नंतर सतत तो जागा बदलत राहिला. दिल्लीहून तो बसने मनालीला गेला. तेथून चंदीगड, हरिद्वार, जयपूर, गोरखपूर, वाराणसी, लखनौ येथे गेला. तेथून पुन्हा तो जयपूरला आला. नंतर अहमदाबाद, द्वारकाला जाऊन परत अहमदाबादला आला. तेथून तो दिव-दमन येथे गेला. नंतर तो राजकोट येथे गेला व परत दिव-दमनला आला. या प्रवासात त्याच्याजवळचे सारे पैसे संपून गेले. मग, तेथेच तो समुद्रकिनारी फिरत जे मिळेल ते खाऊन दिवस कंठित होता.