औरंगाबाद : देवळाई वॉर्डाचे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी चांगलाच दणका दिला. हिवाळे यांची फॅन्सी नंबर प्लेट आणि ब्लॅक फिल्म लावलेली कार चक्क आयुक्तालयात उभी असल्याचे समजल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने सातारा पोलिसांनी कार जप्त करून फॅन्सी नंबर प्लेट व ब्लॅक फिल्म काढून नियमानुसार दंड ठोठावला. याबाबत सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तांनी विनाहेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने आणि ब्लॅक फिल्म लावलेल्या कारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी नवनिर्वाचित नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे पाटील यांची कार (क्र. एमएच-२० सीएक्स ७१७१) ही पोलीस आयुक्तालयात उभा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. आयुक्तांनी तात्काळ कार कोणाची आहे, याची माहिती मागविली. ही कार नवनिर्वाचित नगरसेवकाची असल्याचे समोर आल्यावर त्यांनी सातारा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. थेट पोलीस आयुक्तांचे आदेश आल्यामुळे पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी तात्काळ कारमालकाला फोन करून ठाण्यात येण्याचे बजावले. पोलिसांनी कारची फॅन्सी नंबर प्लेट आणि ब्लॅक फिल्म काढून घेऊन नियमानुसार २०० रुपये दंड ठोठावला. संध्याकाळी ७ वाजता नियमानुसार नंबर प्लेट बसविल्यानंतरच कार पोलीस ठाण्यातून सोडण्यात आली.
नगरसेवकाची फॅन्सी नंबरची हौस
By admin | Published: May 13, 2016 12:03 AM