भाजपने माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, नबी पटेल, कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. काही ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीची छुपी साथ मिळवत शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून काही ग्रामपंचायती निसटल्या. शिवसेनेच्या ताब्यातील पालखेड ग्रामपंचायतीत सेनेचा धुव्वा उडाला. या ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व मिळविले. महालगाव गटातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवले. भाजपने २९५ जागा मिळविण्यासह २८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व तसेच १२ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचाच सरपंच होणार असल्याचा दावा केला आहे. शिऊर, खंडाळा, वैजापूर ग्रामीण दोन, वाघलगाव, शिवराई, नेवरगाव, वाहेगाव (ता.गंगापूर), काटेपिंपळगाव, करंजगाव आदी ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास ग्रामपंचायतींवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे ८७ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, तर पंधरा ग्रामपंचायती आमच्या ताब्यात येतील, असे शेख अकील शेख गफुर यांनी सांगितले. महाविकास आघाडीने २९२ जागा मिळवून २८ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच होऊ शकतात अशी माहिती माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ व जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी दिली. वीरगाव, लाडगाव आदींसह तीस ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने काँग्रेस नेते सुभाष झांबड यांच्या पॅनलला चारी मुंड्या चीत करीत करंजगावात विजयश्री खेचून आणली.
चार ठिकाणी सारखी मते
विनायकराव पाटील महाविद्यालयात तीस टेबलवर अकरा फेऱ्यांद्वारे निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली. दुपारी २ वाजता सर्व निकाल घोषित करण्यात आले. रघुनाथपूरवाडी येथील प्रभाग क्र. तीन, चांडगाव येथील प्रभाग क्र. दोन, आघूर येथील प्रभाग क्र. दोन व बेंदवाडी येथील प्रभाग क्र. एक मधील उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. यामुळे चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
फोटो : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५ ग्रामपंचायती ताब्यात आल्याने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करताना.