खुलताबाद : तालुक्यातील गल्लेबोरगाव शिवारात सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील एका गोदामात सुरू असलेला देशी विदेशी दारू निर्मितीचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने उध्दवस्त केला असून पोलीसांनी जवळपास ६४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे हे खुलताबाद- कन्नड भागात रात्री गस्त घालत असतांना गुप्तबातमीदाराने गल्लेबोरगाव शिवारात सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गालगत गल्लेबोरगाव येथील संजय भागवत यांच्या शेतातील गोदामात स्पिरीट पासून बनावट देशी विदेशी दारू तयार करून ती विक्री करतात अशी माहिती दिली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री तीन वाजता शेतातील गोडावूनमध्ये गेले असता गोडावून समोर उभे असलेले आठ - नऊ इसम अंधारात शेतातील मक्यात पळून गेले. यावेळी पोलीसांनी पाठलाग केला करून संजय कचरू भागवत वय 48, महेश संजय भागवत वय 26 , योगेश वसंतराव डोंगरे वय 26 ( सर्व रा.गल्लेबोरगाव ता.खुलताबाद ) यांना ताब्यात घेतले.
यानंतर गोडाऊनमधील बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याच्या साहित्यासह स्पिरीटचे 18 ड्रम. मिळून आले. तसेच तयार बनावट देशीचे 79 बॉक्स, प्लास्टीकच्या दोन टाक्यामध्ये तयार एक हजार लीटर देशी दारू, दोन पँकेजिंग मशीन , दोन मिक्सर , एक फिलींग मशीन , विविध कंपन्यांच्या नावाचे बनावट देशी दारूचे स्टीकर, बनावट झाकने, पँकेजिंग कँप , बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लेवर्स,व देशी दारूचे बॉक्स पँक करण्यासाठी लागणारे पुठ्ठे ,तयार दारूची वाहतूक करणायासाठी एक वाहन आयशर, एक तवेरा गाडी, महिंद्रा बोलेरो पिकअप. व दोन मोटार सायकली असा एकूण 63 लाख 83 हजार 813 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय भागवत , महेश भागवत , योगेश डोंगरे यांच्याविरूध्द खुलताबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील , अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे , उपनिरिक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोंळके, स.फौजदार सुधाकर दौड, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हेे, शिरसाठ, विठ्ठल राख, रतन वारे, गणेश मुळे, योगेश तरमाळे, वसंत लटपटे, संजय तांदळे, उमेश बकले यांनी केली आहे.अधिक तपास खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे, पोहेकॉ यतीन कुलकर्णी, वाल्मिक कांबळे, गणेश लिपने हे करत आहेत.