औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी १८२ एकर भूसंपादनाचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला आहे. १८ जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणास भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.ने भू-मोजणीच्या अनुषंगाने ३ लाख ५१ हजार रुपये ऑक्टोबर २०२० मध्ये भूमी अभिलेख कार्यालयास जमा केल्यानंतर आता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होणार आहे. भू-संपादन विभाग उपजिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे.
भूमीअभिलेख उपअधीक्षकांनी भूसंपादनासाठी नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये त्यांनी अतितातडीने मोजणी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७ आणि ५५५ मध्ये मोजणी होणार आहे. मोजणी अंती प्रत्यक्ष सीमांकन पाहण्यात येणार आहे. उपाधीक्षकांनी काढलेल्या नोटीसमध्ये मालमत्ताधारकांची नावे आहेत. त्यानुसार मोजणी केली जाणार आहे. नोटीसची एक प्रत विमानपत्तन निदेशक चिकलठाणा, विमानतळ प्राधिकरण यांना देण्यात आली आहे. विमानतळ भू-संपादनाबाबत झालेल्या चर्चेअंती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी मोजणी रक्कम भरली असून संयुक्त मोजणीनंतर भू-संपादन प्रक्रियेला सुरुवात होत आहे.
सध्या विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट म्हणजेच २ हजार ८३५ मीटर आहे. १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भू-संपादन करावे लागणार आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भू-संपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. पहिल्या टप्प्यात १५५ एकर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन एकर, तिसऱ्या टप्प्यात दोन एकर आणि चौथ्या टप्प्यात २० एकर असा १८२ एकर संपादित करण्याचा प्रस्ताव सध्या समोर आलेला आहे. हे भूसंपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम लागणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, महसूल प्रशासन आणि कृषी, भूमी अभिलेख कार्यालय यासाठी काम करणार आहेत.
८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणारमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने भूसंपादनाच्या अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे ऑक्टोबर २०२० मध्ये मोजणी रक्कम भरली. त्यानंतर १ जानेवारी २०२१ रोजी भू-संपादनाची अधिकृत घोषणा करणारी नोटीस भूमी अभिलेख कार्यालयाने जारी केली. ७/१२ भूमी अभिलेख कार्यालयाकडे आल्यानंतर संयुक्तरीत्या जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. या भू-संपादनाला मोठी रक्कम लागेल. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणार, असे सूत्रांनी सांगितले.