औरंगाबाद : मराठी भाषासंवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्ह्यात एकमेव ‘ग्रंथ प्रदर्शन’ मंगळवारी भरवण्यात आले. शासन दरबारी मराठी भाषेबद्दल किती अनास्था आहे, याची प्रचीती या प्रदर्शनाच्या निमित्ताने आली. ग्रंथ प्रदर्शनात मोजून २५ ग्रंथ ठेवण्यात आले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ग्रंथाएवढेच रसिक उपस्थित होते. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयातील भाषा संचालनालय विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या विभागाने यंदा निधी नसल्याचे कारण दाखवून मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यात कोणतेही कार्यक्रम घेण्याचे टाळले. मंगळवारी कार्यलयाच्या प्रांगणातच ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रल्हाद लुलेकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह के.एस. अतकरे विभागीय सहायक अरुण गिते यांच्यासह शासकीय मुद्रणालयाचे कुमावत, कार्यालयीन अधीक्षक वसाबे, नितीन बागडे, महेश लोखंडे, दिलीप लादे, सिद्धार्थ दिवेकर, काकडे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन समारंभाम मान्यवरांनी शासन स्तरावर मराठी भाषेला दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि अनास्था यावर बरीच चर्चा केली. हे सर्व मुद्दे आणि गुद्दे ऐकण्यासाठी व्यासपीठासमोर मोजून २५ रसिक उपस्थित होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात भाषा संचालनालय विभागाने ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असायला हवी. मंगळवारी ज्या वाचकांनी प्रदर्शनाला भेट दिली त्यांचा भ्रमनिरास झाला. प्रदर्शनात एकही दखलपात्र ग्रंथ अथवा पुस्तक पाहायला मिळाले नाही. शासकीय शब्दकोश मात्र आवर्जून ठेवण्यात आले होते. शासन दप्तरी दाखविण्यासाठी आजच्या ग्रंथ प्रदर्शचा उपक्रम राबविण्यात आला, हे विशेष.
मोजून फक्त २५ ग्रंथ!
By admin | Published: May 14, 2014 12:12 AM