लातूर : मतदानानंतर आता मतदारांसह उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन येथे रविवारी होणार असून, लातूर शहराची २२ व ग्रामीणची २४ फेऱ्यांद्वारे मतमोजणी पूर्ण होणार आहे. अहमदपूर २४, उदगीर २१, निलंगा २३ आणि औसा विधानसभा मतदारसंघाच्या २१ फेऱ्या मोजल्या जातील. एकंदरित, दुपारी १ वाजेपर्यंत सहाही विधानसभा मतदारसंघांतील निकालाचे चित्र स्पष्ट होईल.प्रत्येक विधानसभा मतदानाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले असून, त्यासाठी तीन कर्मचारी आहेत. एक सुपरवायझर, एक असिस्टंट आणि केंद्राचा एक सूक्ष्म निरीक्षक असे तिघे एका टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करतील. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ३०९ बूथ आहेत. या ३०९ बूथच्या मतमोजणीसाठी एकूण २२ फेऱ्या होतील. सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या २२ फेऱ्या दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३३७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रातील मतमोजणीसाठी २४ फेऱ्या होणार आहेत. या २४ फेऱ्याही १ वाजेपर्यंत पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे.अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ३४१ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले असून, या मतदारसंघाची मतमोजणीही २४ फेऱ्यांद्वारे पूर्ण होणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात २९७ मतदान केंद्र आहेत. त्यासाठीही १४ टेबल लावण्यात आले असून, २१ फेऱ्यांत या मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण होणार आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांतील मतमोजणीसाठीही १४ टेबल आहेत. ही मतमोजणी २३ फेऱ्यांत पूर्ण होणार आहे. मतमोजणीचे प्रात्यक्षिक यापूर्वीही करण्यात आले असून, १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीचा डेमो होणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली. सहा विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण १९१९ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवरील मतमोजणीच्या १३७ फेऱ्या होतील. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. औसा विधानसभेची औसा येथील प्रशासकीय इमारतीत, अहमदपूर येथील आयटीआयमध्ये, उदगीर आयटीआय आणि निलंगा विधानसभेची तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले.औसा विधानसभा मतदारसंघात ३०३ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांतील मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले असून, २१ फेऱ्यांद्वारे मतमोजणी पूर्ण होणार आहे. एकंदर, जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल आहेत. प्रती टेबलसाठी तीन कर्मचारी आणि अन्य कामांसाठी वेगळे कर्मचारी आहेत. त्यामुळे मतमोजणी दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
२२ फेऱ्यांत पूर्ण होईल लातूर शहराची मतमोजणी
By admin | Published: October 17, 2014 12:25 AM