नवी दिल्ली : १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’मुळे केरळ, ओडिशा, पुडुचेरी, आसाम आणि तेलंगणा या राज्यांत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला.
नवीन कृषी कायदे आणि कामगार कायद्यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. इतरही अनेक मागण्या संघटनांनी केल्या आहेत.
संघटनांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, केरळ, पुडुचेरी, ओडिशा, आसाम, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तामिळनाडूच्या १३ जिल्ह्यांत बंदचा प्रभाव राहिला. पंजाब आणि हरियाणात बस सेवा बंद राहिली. प. बंगाल आणि त्रिपुरातील जनजीवन विस्कळीत झाले. प. बंगालमध्ये तुरळक स्वरूपात हिंसक घटना घडल्या. अनेक राज्यांत बँकिंग सेवेवर परिणाम झाला.
या आंदोलनाचे नेतृत्व इंटक, आयटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एआयटक, टीयूसीसी आणि सेवा या संघटनांच्या शिखर संस्थेने केले. इतरही अनेक संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या. भाजपाशी संलग्न असलेला भारतीय मजदूर संघ मात्र बंदमध्ये सहभागी नव्हता.
हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू यांनी सांगितले की, २५ कोटींपेक्षा जास्त कामगार आंदोलनात सहभागी झाले. खाण, संरक्षण, रेल्वे आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कामगारही आंदोलनात सहभागी झाले.
सिद्धू यांनी सांगितले की, वीज कामगार, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, फेरीवाले, शेतमजूर, रिक्षावाले व इतर वाहन चालक तसेच स्वयंरोजगारप्राप्त व्यावसायिक असे सर्व स्तरातील कामगार बंदमध्ये सहभागी झाले.
...........................