औरंगाबाद : ‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी स्पेन येथील नवउद्योजक, औरंगाबादेतील उद्योजक आणि नवोपक्रम सादर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय इनक्युबेशन सेंटर व ‘इंडो- युरो इंट्रेप्रेन्यूयरशिप कॉनक्लेव’चे उद्घाटन झाले.
‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोक हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सीआयआय’च्या अध्यक्षा मोहिनी केळकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बजाज ‘सीएसआर’चे प्रमुख सी. पी. त्रिपाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर यांनी केले. वाडेकर यांनी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरमार्फत चालणाऱ्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सादर केली.
ते म्हणाले, महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायामध्ये नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नवउद्योजक, विद्यार्थ्यांना फिलीप कॅपिटल (हाँगकाँग), जिनेट (मेक्सिको, स्पेन, भारत), मॉनड्रगन कॉर्पोरेशन (स्पेन) या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उद्योजकांना जागतिक बाजारपेठांमध्ये मार्केट, गुंतवणुकीसाठीदेखील हे सेंटर एक माध्यम म्हणून काम करील. १ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सेंटरमध्ये केवळ ‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थीच नव्हे, तर मराठवाड्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी, नवउद्योजक व उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण, उत्पादनांचा विकास आणि मार्केटिंगबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी ‘स्काऊट’ आणि ‘जिनेट’ या आंतरराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश वानखेडे, ‘प्रॉमेथियस ग्लोबल’चे संस्थापक पंकज जैन, सी. पी. त्रिपाठी, ‘प्रयास’ संस्थेचे संस्थापक अविनाश सावजी आदींनी मनोगत व्यक्त केले. स्पेन येथील नवउद्योजकांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उयोग, बाजार व नवसंकल्पना विशद केल्या.
अध्यक्षीय समारोप ‘सीआआय’च्या अध्यक्षा मोहिनी केळकर यांच्या भाषणाने झाला. यावेळी विलास भांगे, संतोष पगारे, अभिषेक गुंबले, विनोद हरकूट, मनोज आदमाने, सचिन जैन, अतुल गारगडे, महेंद्र शिंगारे, प्रणय साळवे, मिलिंद काशिदे आदी उद्योजकांसह स्थानिक उद्योजक, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जिनेट’च्या दोन प्रतिनिधींनी केले.