‘देश की आंधी... राहुल गांधी’; काँग्रेसच्या विजयाचा शहरभर जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:14 PM2018-12-12T13:14:09+5:302018-12-12T13:23:19+5:30
तिन्ही राज्यात काँग्रेसची आघाडी जसजशी वाढू लागली. तसतसा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
औरंगाबाद : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील काँग्रेसच्या प्रचंड विजयाबद्दल आज शहरभर जल्लोष साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी फटाके उडविण्यात आले. मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला, तर ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्ते नाचले.‘देश की आंधी... राहुल गांधी’, ‘आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
मंगळवारी सकाळपासूनच निकाल यायला लागले. सकाळी ११ वाजेपर्यंत कलही स्पष्ट झाले. तिन्ही राज्यात काँग्रेसची आघाडी जसजशी वाढू लागली. तसतसा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दूरचित्रवाणीवर पाहिल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना सोशल मिडियावरुन अभिनंदन करण्यात आले आणि विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी निरोप धाडण्यात आले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते गांधी भवनात जमले. गांधी भवन परिसरात तिरंगा झेंडा घेऊन अनेक कार्यकर्ते पोहोचले.तिथे फटाके फोडून तसेच मिठाई वाटप करण्यात आले. तिथे राहुल गांधींचा जयजयकार करीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.
नंतर क्रांतीचौकात ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी नृत्याचा ठेका धरला. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. क्रांतीचौक परिसरात आज तिरंगी झेंडे फडकताना दिसले. क्रांतीचौकात शहर काँग्रेसतर्फे जल्लोष करण्यात आला. पैठणगेटला युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते जल्लोषासाठी एकत्र जमले होते. दुपारी कॅनॉट गार्डनमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून मिठाई वाटप करून व ‘संविधान जिंदाबाद.... हुुकूमशाही मुर्दाबाद’च्या घोषणा देत जल्लोष केला. गारखेड्यातील श्रीनगर हाऊसिंग सोसायटीतही पेढे वाटण्यात आले.
महिला कार्यकर्त्यांत उत्साह
क्रांतीचौकात सरोज मसलगे पाटील आणि रेखा जैस्वाल या महिला कार्यक़र्त्यांनी फुगडी खेळली.कार्यकर्त्यांनी रस्यावरील नागरिकांना मिठाईचे वाटप केले. कॅनॉट गार्डन, जयभवानीनगर आदी भागातही कार्यकर्त्यानी जोरदार विजयाचा आनंद साजरा केला.