औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांत वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. कोरोना चाचण्या आणि वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढविण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीची बैठक झाली. ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कोविड केअर सेंटर्स वाढवावेत. लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना सीसीसीमध्ये उपचार द्यावेत. गंभीर, त्रास आणि उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध झाल्या पाहिजेत. २५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात. संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावेत. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गावागावात जाऊन सर्वांच्या चाचण्या तातडीने करून घ्याव्यात. दरदिवशी १०० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी वाढीव प्रमाणात सीसीसीची उपलब्धता आणि चाचण्यांचे वाढीव प्रमाण या बाबी नियंत्रित कराव्यात. सीसीसीसाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने तातडीने भरती करावे. त्याची कार्यवाही लगेच सुरू करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमार्फत करण्यात येणाऱ्या वाढीव चाचण्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानिक यंत्रणेमार्फत सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीत मनपा आयुक्त अास्तिककुमार पाण्डेय, अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य, महसूल, न.पा., पोलीस, कृषी, सहकार व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना अशाग्रामीण भागात चाचण्या आणि कोविड केअर सेंटर तातडीने वाढवा. ग्रामीणमध्ये खासगी रुग्णालये सीसीसीसाठी वापरावेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना चाचण्या वाढवाव्यात. ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये मनुष्यबळ, उपचार सुविधांसह सज्ज ठेवावे लागणार. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिन्यांची माहिती सादर करावी. जेणेकरून नवीन वाढीव सीसीसीसाठी त्या पुरेशा प्रमाणात तयार ठेवता येतील.