औरंगाबाद : श्रेयनगर परिसरातील कासलीवाल हेरिटेज सोसायटीत २१ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यापैकी उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पती बेशुद्ध असून, तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण मात्र, समजू शकले नाही. याविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
शीतल नितीन अग्रवाल (४२) असे मृत महिलेचे नाव आहे. शीतल यांचा पती नितीन अग्रवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, नितीन अग्रवाल यांची खडकेश्वर परिसरात बीयर शॉपी आहे, तर त्यांची पत्नी गृहिणी होत्या. १६ वर्षांची मुलगी आणि १३ वर्षांचा मुलासह अग्रवाल दाम्पत्य श्रेयनगर परिसरातील कासलीवाल हेरिटेज येथे राहात होते. काहीतरी कारणावरून शीतल आणि नितीन यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार समजताच, मित्र संदीप जीवनलाल मुंदडा यांनी त्यांना बेशुद्धावस्थेत गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाला. या घटनेविषयी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार मंदा समासे हे तपास करीत आहेत.नितीन अग्रवाल हे घटनेपासून बेशुद्ध असून, त्यांचा जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही. या दाम्पत्याने विष प्राशन करण्याचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.