वाळूज महानगर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याला चौघांनी बदडल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) दुपारी जोगेश्वरीत घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, निकिता मनोहर पारखे (२०) हिचे किरण खंडाळे (रा. घाणेवाडी, ता. बनापूर) याच्या सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी निकिता ही पती किरण यास सोडून माहेरी जोगेश्वरीत परतली. यानंतर निकिता ही भंगार व्यावसायिक अर्जुन राजपूत याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये गावात राहत होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास निकिता हिची आई उषाबाई पाखरे, मामा भारत बनकर, सासू गंगूबाई खंडाळे व दीर सचिन खंडाळे हे चौघे तिच्या घरी गेले. या चौघांनी निकिता व अर्जुन या दोघांसोबत वादावादी करण्यास सुरुवात केली. या चौघांनी तू अर्जुन सोबत राहू नको असे म्हणून निकिता व अर्जुन यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना निकिताने मी माझ्या मर्जीने अर्जुन राजपूत याच्या सोबत राहत असल्याचे सांगताच संतप्त झालेल्या निकिताची सासू गंगूबाई व मामा भारत बनकर या दोघांनी काठीने निकिता व अर्जुन यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत निकिता व अर्जुन राजपूत हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी निकिता पारखे हिच्या तक्रारीवरून उषाबाई पारखे, भारत बनकर, गंगूबाई खंडाळे व सचिन खंडाळे या चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. काकासाहेब जगदाळे हे करीत आहेत.
---------------------
कामावरून कमी केल्यामुळे दोघा भावंडांना मारहाण;
तिघांविरुध्द गुन्हा दाखल
वाळूज महानगर : चालकास कामावरून कमी केल्याच्या कारणावरून टेम्पोचालक व त्याच्या भावास तिघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवार (दि.२३) दुपारी २ वाजेच्या सुमारास वडगावात घडली. या मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, एकनाथ अर्जुन जाधव (३२, रा. वडगाव) यांनी तीन-चार महिन्यांपूर्वी आपल्या टेम्पोवर चालक म्हणून काम करणाऱ्या किशोर जाधवने अपघात केला व टेम्पोचे नुकसान केले. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास किशोर जाधव, त्याचा मुलगा आकाश व अन्य एका अनोळखी इसमास घेऊन एकनाथ जाधव यांच्या घरी गेले. त्यानंतर किशोर जाधवने माझ्या कामाचे ६ हजार रुपये आत्ताच दे, असे म्हणून वाद घालत एकनाथ जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी किशोर जाधव व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमाने एकनाथ जाधव यांचे हात धरून ठेवले, तर आकाश याने लाकडी दांड्याने एकनाथ जाधव यांच्या डोके, कपाळ व पाठीवर मारले. ही मारहाण सुरू असताना एकनाथ जाधव यांचा भाऊ नवनाथ जाधव हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली. याप्रकरणी एकनाथ जाधव यांच्या तक्रारीवरून किशोर जाधव, आकाश जाधव व एका अनोळखी इसमाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. भीमराव शेवगे हे करीत आहेत.
------------------------