औरंगाबाद: कुरिअर कंपनी मालकाचा विश्वासघात करून २६ लाख ९३ हजार ७८५ रुपयांचा अपहार केल्याच्या गुंह्यात सिटिचौक पोलिसांनी कंपनीच्या नोकराला गुरुवारी रात्री उशीरा भावसिंगपुऱ्यात अटक केली . आरोपीला न्यायालयाने ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली . श्रीकांत सुदेश धिवरे (रा संभाजी कॉलनी , सिडको एन ६ ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की , कुरिअर कंपनीचे चालक राजेश इंद्रवन ठक्कर (रा गारखेडा परिसर ) यांच्या तक्रारीवरुन आरोपी श्रीकांतविरूध्द सिटिचौक पोलीस ठाण्यात विश्वासघात करून २६ लाख ९३ हजार ७८५ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि कर्मचारी संजय नंद , आप्पासाहेब देशमुख, तायडे , माजेद पटेल , तोटेवाड , महिला कर्मचारी बडेकर यांनी त्याचा शोध घेत होते . आरोपी भावसिंगपुरा येथील नातेवाईकाच्या घरात लपून बसल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली . यानंतर पोलीस पथकाने गुरुवारी रात्री उशीरा त्याला भावसिंगपुरा येथे अटक केली.
आज सकाळी आरोपी श्रीकांतला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी न्यायालयास सांगितले की, अपहार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, अपहार केलेली रक्कम जप्त करायची आहे, आरोपीने अपघात झाल्याचा बनाव केला होता, याविषयी माहिती घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली.