औरंगाबाद : मालकाचा विश्वासघात करून कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने २६ लाख ९३ हजार ७८५ रुपये हडप केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आरोपीने अपघाताचा बनाव करून पैसे गहाळ केल्याची तक्रार कंपनीच्या मालकाने सिटीचौक पोलिसांमध्ये दिली आहे.
श्रीकांत संदेश धिवरे (रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार राजेश इंद्रवदन ठकराय, रा. गारखेडा) यांचे पानदरिबामध्ये कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. बीड येथील कार्यालयाचा कारभार पाहणे, प्राप्त पार्सल ग्राहकांना देणे आणि त्यांच्याकडून घेतलेली रक्कम कंपनीत जमा करून दररोज हिशोब देण्याची जबाबदारी धिवरे याच्यावर होती. ११ जून ते ११ जुलै २०२० या एक महिन्याच्या कालावधीतील बीड कार्यालयाचा हिशेब धिवरे याच्याकडे बाकी होता.
११ जुलै रोजी त्याने मालकाला एक दिवसाचा थातूरमातूर हिशेब दिला. मागील महिन्याची हिशेबाची रक्कम त्याच्याकडेच होती. ११ जुलै रोजीच ही रक्कम सोबत ठेवून अहमदनगर येथे जात असल्याचे त्याने ठकराय यांना सांगितले. यानंतर रस्त्यात त्याच्या वाहनाला अपघात झाला व अपघातात त्याच्याजवळची कंपनीची रक्कम गहाळ झाल्याची माहिती त्याने ठकराय यांना कळविली. मात्र, तो ठकराय यांना भेटण्यासाठी आला नाही. प्रत्यक्षात कंपनीचे २६ लाख ९३ हजार ७८५ रुपये हडपण्याच्या उद्देशाने त्याने अपघाताचा बनाव केल्याचे तक्रारदार यांच्या निदर्शनास आले. आरोपी धिवरे याने विश्वासघात करून कुरिअर कंपनीची रक्कम हडपल्याची तक्रार ठकराय यांनी सिटीचौक ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा नोंदविली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आरोपीचा शोध घेत आहेत.