औरंगाबाद : दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात बनावट सही- शिक्क्याचे ऐपत प्रमाणपत्र (सॉलव्हन्सी सर्टिफिकेट) सादर करणाऱ्या भामट्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी लाला चव्हाण, असे बनावट ऐपत प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आरोपीचे नाव असून ही घटना ८ फेब्रुवारीला जिल्हा व सत्र न्यायलयात घडली. दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी छबू नामदेव चव्हाण याच्या (खटला क्रमांक ११८/ २०२०२) जामीन अर्जावर ८ फेब्रुवारील दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने छबू चव्हाण यास जामीन मंजूर केला तेव्हा शिवाजी लाला चव्हाण याने न्यायालयाकडे ऐपत प्रमाणपत्र सादर केले. काही दिवसांनंतर हे ऐपत प्रमाणपत्र बोगस असल्याचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या लक्षात आले. याबाबत संबंधित कार्यालयाकडे खातरजमा केली असता शिवाजी चव्हाण याने खांबेवाडी (ता. जि. जालना) व जालना तहसील कार्यालयाच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून ऐपत प्रमाणपत्र तयार केले व ते न्यायालयात जामीन घेण्यासाठी सादर केले असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, शनिवारी न्यायालयीन अधीक्षक उषा रखमाजी हिरे यांच्या तक्रारीनुसार वेदांतनगर ठाण्यात बनावट कागदपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी लाला चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राहुल भदरगे करत आहेत.