दोन्ही लसी परिणामकारक : जिल्ह्यात कोविशिल्डचा पुरवठा व लसीकरण सर्वाधिक
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी ७० ते ८० टक्के परिणामकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण औरंगाबाद जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचा सर्वाधिक पुरवठा होत आहे. त्यातुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा केवळ नावालाच होत आहे. मागणी करूनही ही लस मिळतच नाही. त्यामुळे कोविशिल्ड लसीचा डोस घेण्यालाच नागरिकांना पसंती द्यावी लागत आहे.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीच्या रूपात सुरक्षेची ढाल मिळाली आहे. जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत नागरिकांना ६ लाख ७१ हजार डोस देऊन झाले आहेत. यात तब्बल ५ लाख २८ हजार नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे, तर एक लाख ४२ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
कोव्हॅक्सिनची अनेक नागरिकांकडून आवर्जून मागणी केली जाते. परंतु, या लसीचा डोस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस मिळणेही अवघड झाले होते. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देणेही बंद करण्याची वेळ ओढावली. कोरोनाचे संकट कायम असल्याने कोव्हॅक्सिन मिळाली नाही तर नागरिक कोविशिल्ड लस घेत आहेत.
--
उपलब्ध लस घेण्यावर भर द्यावा
सध्या जी लस उपलब्ध आहे, ती लस घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक लस ही ७० ते ८० टक्के परिणामकारक आहे. त्यामुळे कोणत्याही एका लसीचा आग्रह धरता कामा नये.
- डाॅ. महेश लड्डा, नोडल ऑफिसर, लसीकरण
------
कोविशिल्डच का ?
-औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणात कोविशिल्ड लसीचे डोस देण्याचे आणि घेण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्याला या लसीचा पुरवठा सर्वाधिक होत आहे.
-कोविशिल्डचे आतापर्यंत सात लाख एक हजार ७०० डोस मिळाले आहेत. या लसीचे आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे एकूण सहा लाख ३२ हजार डोस देऊन झाले आहेत.
- गेल्या सहा महिन्यांत कोव्हॅक्सिनचे केवळ ५९ हजार ८५० डोस मिळाले आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे.
-----
एकूण लसीकरण
कोविशिल्ड - ६,३२,२८२
कोव्हॅक्सिन - ३८,७५१
---------
वयोगटानुसार लसीकरण
कोविशिल्ड -------- कोव्हॅक्सिन
पहिला डोस - दुसरा --- पहिला डोस - दुसरा
आरोग्य कर्मचारी - ३७,७१५- १९,१७७- --- ३,६६१ - २,६९३
फ्रंट लाईन - ६८,७८५- २२,५७४ --- -४७७३-४१३७
१८ ते ४४ - ३०,४२२ -१७० - --- ५,८८०-१,७३२
४५ ते ५९ - २,०७,५३७- ४०,६४० -- -३,७६८-४,४५६
६० वर्षांवरील - १,५३,१३५- ४२,४८५ --- -५,०५१-२,५३८