- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर - मोकाट श्वानांना चारचाकीपासून दूर ठेवण्यासाठी चक्क खिळे असलेले कव्हर वापरले जात आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात सुरू असून प्राणिप्रेमींमधून मात्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर रात्री चारचाकी उभ्या असतात. त्यांच्या टपावर श्वान जाऊन बसतात. यातून स्क्रॅचेसही पडतात. कधी-कधी छत दबते, तसेच काचा फुटण्याचा धोकाही असतो. यावर उपाय म्हणून खिळेयुक्त कव्हर बाजारात आले आहे. चारचाकीच्या छतावर आणि समोरील बाजूवर हे कव्हर टाकता येते.
चारचाकीपेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे, हे समजून घेतले पाहिजे. चारचाकीवर स्क्रॅचेस पडतात, म्हणून अशा टोकदार खिळे असणाऱ्या कव्हरला प्रमोट करता कामा नये. चारचाकीवर साधे कव्हरही वापरता येतील. - अमृता दौलताबादकर,सचिव, पीपल फाॅर ॲनिमल
चारचाकीसाठी टोकदार खिळे असलेले कव्हर वापरणे चुकीचे आहे. श्वानांना त्यापासून इजा होऊ शकते. अशा कव्हरवर बंदी आली पाहिजे.- प्रवीण ओहळ, सचिव, होप अँड ॲनिमल ट्रस्ट
वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी हा उपाय नाहीवाहनाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशा प्रकारचे कव्हर वापरणे, हा त्यावर पर्याय नसल्याचे प्राणिप्रेमी संघटनांनी म्हटले. टोकदार खिळे कव्हर टाकल्यानंतर मोकाट श्वान अशा चारचाकीपासून दूर राहतात; परंतु, अशा कव्हर असलेल्या चारचाकीवर पहिल्यांदा जाणारे श्वान जखमी होण्याचा धोका आहे.