औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील विविध विभागांच्या इमारतींवरील तब्बल ४५ पाण्याच्या टाक्यांची झाकणेच गायब आहेत. या टाक्यांतील पाणी महिनोन्महिने उघडे आहे. अनेक टाक्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. यातून डास उत्पत्तीलाही हातभार लागत असल्याने घाटी डेंग्यूचे उगमस्थान ठरू पाहत आहे. काही टाक्यांतील पाणी पिण्यासाठीही वापरण्यात येत असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच छावणीत तब्बल सहा हजार नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सगळ्या प्रकरणांत अस्वच्छ पाणी हेच कारण असल्याचे समोर आले होते. घाटी रुग्णालयात जवळपास १०८ पाण्याच्या टाक्या आणि हौद आहेत. त्यांची जवळपास दीड वर्षापूर्वी स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची साफसफाईच झालेली नाही. छावणीतील गॅस्ट्रोच्या घटनेनंतर जागे झालेल्या घाटी प्रशासनाने परिसरातील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्याचे आदेश दिले. परंतु अद्यापही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे चित्र आहे. बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, सर्जिक ल इमारतींसह इतर विभागाच्या इमारतींवरील तब्बल ४५ टाक्यांना झाकणेच नसल्याचे समोर आले आहे.एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावरही अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते.
लवकरच झाकणे लावणारपाण्याच्या टाक्यांना लवकरच झाकणे लावली जातील. ही झाकणे सुरक्षित राहण्यासाठी कुलूप लावले जाईल. केवळ ४ ते ५ टाक्यांतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. उर्वरित सर्व टाक्यांमधील पाणी स्वच्छतेच्या कामासाठी वापरले जाते.
-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी