लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला लागून असलेल्या अंबड मार्गावरील इंदेवाडी येथे विष प्रयोग केल्यामुळे २४ गायींचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मृत गायी गावातील मारोती मंदिर देवस्थानच्या होत्या. ग्रामस्थांनी मोठा खड्डा करून त्यांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार केले. यासर्व प्रक्रियेला सात तासांहून अधिक कालावधी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंदेवाडीचे सरपंच शिवनाथ काळे यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले, की इंदेवाडी येथील मारोती मंदिर संस्थानाच्या ३५ ते ४० गायी आहेत. या गायी रात्री गाव शिवारात चरण्यासाठी जात व सकाळी मंदिर परिसरात परत येतात. काल रात्री नेहमीप्रमाणे या गायी चरण्यासाठी गाव शिवारात गेल्या होत्या. परंतु, आज सकाळी यातील दोन ते तीन गायी मंदिरासमोर मृत आढळून आल्या.ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी शिवारात अन्य गायींचा शोध घेतला असता, शिवरात शेतांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी २२ गायी मृत आढळून आल्या. तसेच सात ते आठ गायी या अत्यवस्थ असल्याचे दिसून आले.माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तालुका ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक निमिष मेहेत्रे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. जे. एम. बक्तुरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सोपान चोपडे हे घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय पथकाने अत्यवस्थ गायींवर उपचार सुरू केले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दोन गायी जालना-अंबड रस्त्यावर ठेवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली.दरम्यान, पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पोलीस व वैद्यकीय अधिकाºयांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्व गायी ट्रॅक्टरमध्ये टाकून एका ठिकाणी आणल्या. तिथे पोकलेनच्या मदतीने मोठा खड्डा खोदून सर्व मृत गायींवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी इंदेवाडी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अमन सिरसाट तपास करीत आहेत.
विषप्रयोगाने गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:57 AM