लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस आयुक्तांनी नागरी वसाहतीमध्ये फटाका मार्केटला परवानगी नाकारल्यामुळे शहरातील दुकानदारांनी नवीन जागेचा शोध सुरू केल्याची माहिती समोर आली. नवीन जागेवर परवानगी न मिळाल्यास अथवा दुकानांकडे ग्राहकच न फिरकल्यास कर्ज काढून आणलेल्या मालाचे करायचे काय, असा प्रश्न व्यापा-यांसमोर उभा आहे.दिवाळीचा उत्सव अवघ्या तीन दिवसांवर आलेला असताना पोलीस आयुक्तांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरी वसाहतीमधील फटाका मार्केटला शनिवारी रात्री परवानगी नाकारली. शहरातील शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेवर दरवर्षी फटाक ा स्टॉल लावण्यात येत असत. शिवाय सिडको एन-६ येथील राजीव गांधी क्रीडा मैदान, एन-९ भागातील फरशी मैदान, टी. व्ही. सेंटर आणि मुकुंदवाडी, पुंडलिकनगर आदी ठिकाणी दरवर्षी फटाक्यांची दुकाने व्यापारी थाटतात. या दुकानांना पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून परवानगी मिळत होती.गतवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पोलीस आयुक्तांनी नागरी वसाहतीमध्ये फटाक्यांचे एकही दुकान लागणार नाही, याबाबत काळजी घ्या, असे स्पष्ट आदेश ठाणे प्रमुखांना दिले. नागरी वसाहतीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर दुकाने थाटण्यासाठी जागाच नसल्याने दुकानदारांनी आता गावाबाहेर जागेचा शोध सुरू केला असल्याचे फटाका मार्केट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले.शिवाजीनगर येथील व्यापारी बीड बायपास रोड परिसरात, तर सिडकोतील व्यापारी चिकलठाणा एमआयडीसीत जागेचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्यापा-यांनी मात्र राजकीय मंडळींकडे आपली व्यथा मांडली असून, यावर तोडगा काढण्याची विनंती केली.
फटाका व्यापारी जागेच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:04 AM