छत्रपती संभाजीनगर : आकाशात सुर्रर्र करून धडाडधूमऽऽ आवाज करणाऱ्या फटाक्यांची ध्वनिमर्यादा तपासली तेव्हा लडसाठी १४५ डेसिबल क्षमतेची मर्यादा होती तर ती ८९ ते ९३ डेसिबलपर्यंत निघाली. सिंगल सुतळी बाँब व इतर फटाक्यांची १२५ पर्यंतची कमाल ध्वनिमर्यादा आहे. प्रत्यक्षात ६४ ते ७२.२ तर रॉकेटची ७८.४ ध्वनियंत्रात नोंद झाली. ही तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी केली.
छत्रपती संभाजीनगरात फुटणाऱ्या फटाक्यांचा सर्व आवाज मर्यादेतच असल्याचे यावरून दिसले. परंतु प्रत्यक्षात फुटणाऱ्या फटाक्यांचे मोजमापही मोबाईल व्हॅन करणार आहे. देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या फटाक्यांची चाचणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गाैतम पातारे, इको ग्रीन फाउंडेशनच्या डॉ. मीनाक्षी बत्तासे, राजेंद्र जोशी, औद्योगिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी शांतीलाल नागरे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश गिरी, उपअभियंता नितीन जाधव आणि मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रकाश मुंडे आदी चिकलठाणा एमआयडीसीतील एका मैदानावर यासाठी उपस्थित होते. लवंगी फटाक्यांपासून सुतळी बाँबपर्यंत अनेक फटाक्यांचे आवाज तपासण्यात आले. सिंगल फटाका १२५ तर लड असलेल्या फटाक्यासाठी १४५ कमाल ध्वनी मर्यादा आहे. -सुतळी बाँब, इतर फटाके मेरी गो राउंड - ६४.५, क्राउंन ज्वेलरी ७५,८, रोलिंग बारा शाॅट ६८.१, २५ बूम शाॅट्स ७२.२, आकाशाची शिट्टी ७८.४ , लेजर शो ७७.१, मोरी हायफाय ७४.५, बीट कॉन कलर ८९.४ , २००० वाली लड ८५.७ आणि ९३ डेसिबल अशा नोंदी यंत्रावर झाल्या.
मैदानावर व्यायामपटूंची अडचण...खेळाच्या मैदानावर करण्यात आलेल्या चाचणीमुळे बराच काळ व्यायामपटूंच्या व्यायामात व्यत्यय आला. पण दिवाळीआधीच दिवाळीचा आनंद त्यांनी घेतला. फटाक्यांची आतषबाजी करण्यापूर्वी त्याची चाचणीही होते, हेदेखील अनेक नागरिकांनी मैदानावर थांबून पाहणे पसंत केले.
दबक्या आवाजात फटाके फुटले...मैदानावर दबक्या आवाजात फटाके फोडण्यात आले. पण प्रत्यक्षात तर दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची धुमश्चक्री ऐकण्यास मिळते. मग मोठ्या आवाजाचे फटाके येतात कुठून, अशी चर्चा नागरिक करत होते.