संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात सध्या कमालीचा शुकशुकाट आहे. कारण याठिकाणी सध्या एकही रुग्ण भरती नाही. त्यामुळे येथील पाळणाही रिकामा आहे, पण भंडारा येथील शिशूंचे बळी घेणाऱ्या घटनेने आरोग्य यंत्रणेची अक्षरश: झोप उडालेली आहे. त्यामुळे पूर्ण रुग्णालय रिकामे असतानाही नवजात शिशू विभागातील (एसएनसीयू) सर्वच उपकरणांच्या तपासणीपासून प्रशासन अंग काढून घेऊ शकले नाही. वाॅर्मर, फोटो थेरपी युनिटमध्ये कुठे काही बिघाड तर नाही ना, याचा शोध घेण्यात आला.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिटला आग लागून नवजात बालके दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला. राज्यभरातील नवजात शिशू विभागांतील यंत्रणेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली. फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची सूचना करण्यात आली. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात सध्या एकही रुग्ण दाखल नाही. तरीही यंत्र, उपकरणांची तपासणी करण्याची वेळ ओढावली.
वाॅर्मर, फोटो थेरपी युनिट
२०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. याठिकाणी गेली वर्षभर केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले, पण गेल्या महिनाभरापासून येथे एकही रुग्ण भरती नाही; परंतु तरीही येथील नवजात शिशू स्थिरीकरण कक्षात असलेले वाॅर्मर, फोटो थेरपी युनिटच्या यंत्रणेची तंत्रज्ञांच्या मदतीने तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले.
सर्व उपकरणे सुस्थितीत
रुग्णालयातील सर्व उपकरणांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व उपकरणे सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांनंतर नव्या स्ट्रेनच्या रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आता पुन्हा एकदा ओपीडी सुरू झाली आहे. नव्या स्ट्रेनचे रुग्ण नसल्याने लवकरच आंतररुग्ण विभागही सुरू केला जाईल.
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
फोटो ओळ..
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागातील वाॅर्मरची तपासणी करताना.
नवजात शिशू कक्षाची साफसफाई करताना.